परिविक्षाधिन कालावधी (Probation Period) : बद्दल आवश्यक माहिती
https://www.youtube.com/watch?v=gkiZFlNJmtM&t=1s
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या मनात येणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे परिविक्षाधिन कालावधी किंवा प्रोबेशन पिरियड . स्पर्धा परीक्षा रेल्वेची असो बँकेची किंवा एखाद्या शासकीय विभागाची असो प्रत्येक पदाच्या जाहिराती मध्ये परिविक्षाधिन कालावधीचा उल्लेख आवर्जून केला गेला असतो त्यामुळे प्रत्येकाला ह्या विषयी जिज्ञासा असते. नव्याने एखाद्या पदावर रुजू झालेल्या उमेदवारांसाठी तर तो यक्ष प्रश्नच असतो . बऱ्याच जणांच्या मनात तर धडकीच भरलेली असते .अश्या वेळी मनात चालणाऱ्या हल्लकल्लोळात वेळीच योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. खास अश्या लोकांसाठी हा माहितीचा ठेवा मनातील प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातच सादर करीत आहे ...
१. परिविक्षाधिन कालावधी म्हणजे काय असतो ..... ?
परिविक्षाधिन कालावधी म्हणजे कायम नियुक्ती पूर्वीचा "उमेदवारीचा काळ" तो काळ ज्यामध्ये नियुक्तीकर्त्या द्वारा नव्याने नियुक्त कर्मचाऱ्याच्या नियुक्त पदावरील काम करण्याच्या क्षमतांचा ,त्याचा संबंधित विभागाशी किंवा त्यातील इतर कर्मचाऱ्यांशी वागणूक कशी आहे आहे समजण्याचा प्रयत्न करतात .सदर कालावधीत नवनियुक्त कर्मचाऱ्यास त्याच्या संबंधित पदावरील कर्तव्ये, जबाबदाऱ्या व हक्कांची जाणिव करून देण्याची संधी उपलब्ध दिल्या जाते. समजा आपण अभ्यासात कितीही हुशार असाल ;परीक्षेत कितीही मोठे गुण प्राप्त केले असाल परंतु एखाद्या पदावर काम करण्याचे सामर्थ्य तुमच्यात नसेल तर तुम्ही त्या पदास योग्य न्याय देऊ शकणार नाही पर्यायाने नियुक्ती करणाऱ्या विभागाचे त्यात नुकसान होऊ शकते. थेट कायम नियुक्ती दिल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात . त्यामुळेच नियुक्तीकर्ता व उमेदवार यांनी चांगल्या प्रकारे एकमेकांना समजून घेण्याचा हा काळ असतो. संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती कायम स्वरूपी दयावी कि नाही हे परिविक्षाधिन कालावधीच्या यशस्वीतेवर असते.
२. परिविक्षाधिन कालावधी नेमका किती वर्षांचा असतो ..... ?
केंद्र सरकार व विविध राज्यातील राज्य सरकार द्वारा नियुक्त करावयाच्या विविध पदांसाठीचा परिविक्षाधिन कालावधी हा वेगवेगळा असू शकतो महाराष्ट्र राज्यात साधारणतः बहुतेक पदांसाठीचा हा कालावधी दोन वर्षांचा असतो .नियुक्तीकर्त्या द्वारे तो पुढेही वाढविला जाऊ शकतो.संबंधित कर्मचाऱ्याने जेवढ्या अर्जित व अनर्जित रजा घेतल्या असतील तेवढ्या दिवसांनी सदर कालावधी पुढे ढकलल्या जातो .संबंधित कर्मचारी ज्या कार्यालयप्रमुखाच्या नियंत्रणाखाली काम करीत असेल त्या प्रतिवेदन अधिकारी व संबंधित विभागाचा पुनरिक्षण अधिकारी यांच्या द्वारे सादर केलेल्या विशेष मूल्यमापन अहवालानुसारच त्या कर्मचाऱ्याला कायम नियुक्ती दयावी कि नाही हे ठरविल्या जाते .जवळपास ९५ टक्के कर्मचाऱ्याचा अहवाल सकारात्मकच असतो त्यामुळे ह्या कालावधीत सचोटीने काम केल्यास खबरण्याचे कारण नसते.
३. परिविक्षाधिन कालावधीत कोणकोणत्या सुविधा मिळतात ... ?
परिविक्षाधिन कर्मचाऱ्यास वेतन व इतर सर्व भत्ते हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिले जातात परिविक्षाधिन कालावधीत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतनवाढी सुद्धा दिल्या जातात परंतु एखाद्या कर्मचाऱ्याचा परिविक्षाधिन कालावधी दोन वर्षांचा ठरविण्यात आला असेल आणि त्यानंतर त्याचा कायम नियुक्तीचा आदेश आला नसेल तोपर्यंत त्याला पुढील वेतन वाढी दिल्या जात नाही . बाकी इतर सर्व भत्ते जसे की घरभाडे भत्ता ,वाहनभत्ता ,प्रोत्साहन भत्ता आदी वेळच्यावेळीच दिली जातात
४. परिविक्षाधिन कालावधी यशस्वी पार कसा पडता येईल ..... ?
परिविक्षाधिन कालावधी वेळेत पूर्ण करणे खूप आवश्यक असते .जर तुमचा प्रोबेशन पिरियड चालू असेल आणि संबंधित विभागाला तुमच्या कामात त्रुटी दिसत असेल तर तुमच्या पदावरून तुम्हाला केवळ एक नोटीस देऊन कामावरून कमी केल्या जाऊ शकते. ह्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आधीच निर्णय दिला आहे . त्यामुळे कामात कचुराही नकरता सचोटीने काम करून वेळीच कायम स्वरूपी नियुक्ती मिळवणे आवश्यक होऊन जाते .
५. परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्ताव कसा तयार करावा ..... ?
वर सांगितल्याप्रमाणे संबंधित कर्मचारी ज्या कार्यालयप्रमुखाच्या नियंत्रणाखाली काम करीत असेल त्या प्रतिवेदन अधिकारी व संबंधित विभागाचे क्षेत्रिय पुनरिक्षण अधिकारी यांच्या द्वारे सादर केल्या गेलेल्या विशेष कार्य मूल्यमापन अहवाला नुसारच त्या कर्मचाऱ्याला कायम स्वरूपी नियुक्ती दयावी कि नाही हे ठरविल्या जाते त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची नैतिक जबाबदारी हि कार्यालयप्रमुख यांची असते परंतु सादर अहवाल कधी पाठवावा हे संबंधित कर्मचाऱ्याच्या विभागातील कामकाजावर अवलंबून असते.
सदर परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्ताव खालील प्रमाणे सादर करण्याची कार्य पद्धती असते.
अ. कार्यालयप्रमुख/प्रतिवेदन अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याच्या परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्ताव विशेष कार्य मूल्यमापन अहवाल (एक एक वर्षाचे स्वतंत्र अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह) व आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित विभागाचे क्षेत्रिय पुनरिक्षण अधिकारी यांचेकडे दोन प्रतीत सादर करतात .
ब. संबंधित विभागाचे क्षेत्रिय पुनरिक्षण अधिकारी सदर प्रस्ताव तपासून त्यांचा वर स्वयंस्पष्ट स्वतःच्या अभिप्रायासह पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाचे नियुक्ती प्राधिकारी /नियुक्तीकर्ता यांचे कडे अग्रेषित करतात .
क. संबंधित विभागाचे नियुक्ती प्राधिकारी परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्ताव त्यांचे कडे प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी करून आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे कायम नियुक्तीचा आदेश देतात .
६ परिविक्षाधिन कालावधी विलोपीत करण्याचा प्रस्तावा सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची असतात ?
१. विशेष कार्य मूल्यमापन अहवाल
२. कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत
३. मूळ नियुक्ती आदेशाची सत्यप्रत
४. कर्मचाऱ्याला हजार करून घेण्यासंदर्भातील क्षेत्रिय पुनरिक्षण अधिकारी यांच्या पत्राची सत्यप्रत
५. कार्यालयप्रमुख/प्रतिवेदन अधिकारी यांनी कर्मचाऱ्याला हजर करून घेतल्याच्या पत्राची सत्यप्रत
६. कर्मचाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवालाची सत्यप्रत
७. कर्मचाऱ्याचा चरित्र पडताळणी अहवालाची सत्यप्रत
८. कर्मचाऱ्याचा वेतन निश्चिती आदेशाची सत्यप्रत
९. कर्मचाऱ्याचा जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
१०. कर्मचाऱ्याचा जात पडताळणी प्रमाणपत्राची सत्यप्रत
११.कर्मचाऱ्याच्या अर्जित व अनार्जित रजेचा हिशोबाच पत्र
१२. कर्मचाऱ्याच्या अर्जित व अनार्जित रजेच्या सर्व मंजूर आदेशांची सत्यप्रत
१३.नियुक्तीच्यावेळी जोडलेले सर्वच्या सर्व कागदपत्रांची सत्यप्रत
१४. नियुक्तीनंतरच्या केलेल्या सर्व प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रांची सत्यप्रत
सादर माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास अभिप्राय अवश्य दया ....... keep following
यशोधन वाघमारे
yashodhan01@gmail.com
No comments:
Post a Comment